जगभरातील करोडो लोकशाहिवाद्यांची उर्जाभूमी असणारी पवित्र चैत्यभूमी १ ते ८ डिसेंबर ह्या कालावधीत जनतेसाठी खुली ठेवावी.
भीम आर्मी ची जाहीर मागणी.
विश्वभरातील करोडो लोकशाहीवाद्यांची प्रेरणाभूमी आणि शोषित-पीडित-वंचित-सर्वहारा भारतीयांची उर्जाभूमी असणारी पवित्र चैत्यभूमी , भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या १ डिसेंबर ते ८ डिसेंबर पर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत करोडो अनुयायांसाठी खुली करण्यात यावी अशी जाहीर मागणी भीम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय नेते मा अशोकभाऊ कांबळे यांनी केल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सध्या देशभर सुरू असलेला कोरोनाचा जीवघेणा प्रादुर्भाव लक्षात घेता चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी शक्यतो गर्दी करणे टाळावे असे आवाहन करतानाच अशोकभाऊंनी सरकारला जाहीर आवाहन केले आहे की , आंबेडकरी जनतेच्या विशुद्ध भावना लक्षात घेता ,हा समाज बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला येतो तो कोणताही नवस करण्यासाठी वा फेडण्यासाठी येत नसतो तर तो बाबासाहेबांच्या चरणावर माथे टेकवून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेण्यासाठी येत असतो.
विषमवाद्यांशी लढण्याचे बळ मिळविण्यासाठी तो येत असतो , आणि तिथूनच तो भीमविचारांची ऊर्जा घेऊन जात असतो.हा आंबेडकरी समाज जितका शूरवीर आणि लढाऊ समाज आहे तितकाच तो शिस्तप्रिय समाज म्हणून सुद्धा ख्यातकीर्त आहे. म्हणून सरकारने सुद्धा ह्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य करावे.कोरोनाच्या संदर्भात असणारे सर्व सरकारी नियम लावून येणाऱ्या अनुयायांना मास्क पुरवून आणि सॅनिटायजर करून चैत्यभूमीवर येऊ देण्याची मुभा देऊन आठ दिवसांकरिता चैत्यभूमी खुली करावी अशी जाहीर मागणी अशोकभाऊ कांबळे यांनी केल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
0 Comments