रत्नागिरी : भात, नागली पिकासाठी खरीप हंगाम २०२१ करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागु करण्यात आलेली आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक असून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२१ आहे.
खातेदारांचे व्यतिरीक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या जोखमीच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकाचा विमा करावयाचा नसल्यास त्यांनी याबबतचे विहीत नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँक शाखेत योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे आवश्यक आहे.
अन्यथा त्यांचा अनुसूचित पिकाचा विमा संबंधित बँकेमार्फत आपोआप उतरवला जाईल.
भात पिकासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता २ टक्के दराप्रमाणे रक्कम रु.९१०/- तर विमा संरक्षित रक्कम रु.४५,५००/- आहे. तसेच नाचणी पिकासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता २ टक्के दराप्रमाणे रक्कम रु.४००/- तर विमा संरक्षित रक्कम रु.२०,०००/- इतकी आहे.
योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका/प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था/संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह तसेच आवश्यक त्या कागदपत्रासह विहीत वेळेत सादर करावे.
बिगर कर्जदार शेतकरी विमा संरक्षणासाठी वेब पोर्टलद्वारे थेट अर्ज करु शकतील.
त्यासाठी पिक विमा पोर्टलवर www.pmfby.gov.in शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन दिलेला आहे.
विमा हप्त्याची रक्कम ही पेमेंट गेटवे द्वारे ऑनलाईन भरावयाची आहे. अर्ज सदरच्या प्रणालीवर पूर्ण भरल्यानंतर विशेष ओळख क्रमांकासह पोचपावती मिळेल. तसेच शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारा सूचित केले जाईल.
जनसुविधा केंद्रामार्फत विमा अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित जनसुविधा केंद्र/विशेष हेतू वाहन यांना कोणतेही शुल्क/फी अदा करणे आवश्यक नाही. अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्ड / आधार नोंदणीची प्रत, ७/१२ उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांचा करारनामा / सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र, बॅक पासबुकची प्रत सादर करुन प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.
आपले सरकार सेवा केंद्राद्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत आपला मोबाईल क्रमांक नमूद करुन आधार क्रमांकाचे स्वयंसाक्षांकन करणे बंधनकारक आहे. इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
तरी रत्नागिरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सदर पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे..
न्यूज 24 खबर
रत्नागिरी प्रतिनिधी : विकास धुत्रे
0 Comments