नाशिक : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन काही निर्बंध शिथिल होत असतानाच आज गावांतील रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळून आले आहे...
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची विशेष खबरदारी घेतली असून हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत..
दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या कमी असली तरी जे रुग्ण सापडत आहेत त्यांना कोणत्या विषाणूने ग्रासले आहे याबाबत शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने १५५ रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठविले होते. त्यातील ३० नमुन्यात डेल्टा विषाणू आढळून आला असल्याचे समजते.
जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरात २ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण हे करोनाच्या डेल्टा विषाणूने बाधित झाले आहेत. यात गंगापूर रोड, सादिकनगर, (नाशिक), दोडी, ठाणगाव, मुसळगाव, मेंढी (सिन्नर), महाजनपूर (निफाड), कासारी, मांडवड (नांदगाव), कासारखेडा (येवला), कसबेसुकेणे (निफाड), वडाळीभोई, वरखेड, कुंदेलगाव, कानमंडाळे (चांदवड), कोतवाल वस्ती, शिवाजीनगर (कळवण), घोटी या भागांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचा अहवाल येताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नागरिकांनी घाबरू नये मात्र करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आजार अंगावर काढू नये, आजारावर तातडीने उपचार करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
नाशिकमध्ये १५५ नमुन्यांपैकी ३० नमुन्यात करोना विषाणूचे डेल्टा व्हेरिएंट आढळले असून त्याबाबत खबरदारी घेत आहोत. डेल्टा आणि डेल्टा प्लस विशानुंमध्ये फरक असून डेल्टा प्लस विषाणू हे अधिक धोकादायक आहेत. नाशिकमध्ये सापडलेल्या नमुन्यातील व्हेरीएंट हा डेल्टा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगावी.
- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी.
आरटीपीसीआर चाचणी नंतर ज्यांचा स्कोर २५ पर्यंत होता अशांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. १५५ नमुन्यांपैकी ३० नमुन्यात डेल्टा आढळल्याने सजग होण्याची गरज आहे. विशेष काळजी घ्या थोडाही हलगर्जीपणा तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, अशी वेळ येऊ देऊ नका.
- डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी
0 Comments