खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

पँथर कोई डोर नही जो तोडणेसे टूट जाए , ये तो फांसी का फंदा है, डरना मत इन देश के दूश्मनोंसे क्योंकी, "पँथर" अभी जिंदा है - सम्राट भाई संगारे

"भाई संगारे" "अहमदनगर" जिल्ह्यातील एक आदिवासी भाग ज्या गावात आजही "महाराष्ट्रातील" लालपरी (एस.टी.)जात नाही. ज्याभागाची एकेकाळी ओळख चाळीस गाव डांगाण म्हणून होती.
तब्बल चाळीस गाव मिळून एक आठवड्याचा बाजार,'कोतूळचा' एक लहानसा जीव आपल्या आईवडीलांसोबत १४ किलोमीटर दूर पायी बाजारात जाण्याचा अट्टाहास करत असे. इथं शहरात थोडावेळ लाईट बंद झाली तर स्वतःच्याच बंदिस्त घरात घाबरणार्या मुलांपेक्षा हा थोडा वेगळाच होता. 
त्याला अंधाराची भीती नव्हती, अनवाणी चालताना काट्याची पर्वा नव्हती. जन्मताच वाघाचं काळीज घेऊन जन्माला आलेला छावा तेव्हापासूनच धाडसी होता.चहुबाजूने जंगल, मोठेमोठे डोंगर,दर्याखोर्या ,ह्या डोंगर दर्यातूनच "पँथरचा" जन्म झाला.

"पळसूंदे" गावच्या मातीत हा छावा वाढत होता.एखाद्या गोष्टीतील नायक हा पुढे जाऊन क्रांती घडविणार आहे अशी आकाशवाणी होते अगदी तसंच ह्या बछड्याचं नामकरण म्हणजेच आकाशवाणी वडीलधार्यांनी नाव ठेवलं "हिरालाल" जणू ह्या हिऱ्याची चमक तेंव्हाच त्यांच्या चेहर्‍यावर झळकली असावी. पुढे हा 'हिरा' चमकणार ह्याची खात्री ठेऊनच नामकरण झालं असावं. त्यावेळी दळणवळणाची साधने जास्त नसल्यामुळे आणि जेमतेम असतील तीही परवडत नसल्याने कित्येक वेळा डोंगरदर्यातील वाटा ह्याने पायीच तुडवील्या.'वेड्यावाकड्या खडतर वाटांवर बेखौफ चालण्याची कला "भाईंना" तेंव्हापासूनंच ज्ञात होती.
आज हर एक रास्ता हमारे कदमोमें झुका है.....
क्योंकी बचपनसे हमने कांटोपे चलना सिखा है..... 
       
"भाई" त्यावेळीही जंगलातील श्वापदांना घाबरले नाहीत आणि राजकारणातही कोल्हयालांडग्यांना घाबरले नाहीत. आईवडिलांनी केलेले संस्कार आणि परिस्थितीने दिलेला आकार म्हणजे "भाई". गावात फक्त भातशेती तीसुद्धा बेभरोसे पावसावर आधारलेली कधी पाऊस नाही म्हणून उपाशी कधी जास्त झाला म्हणून पोटभर खाऊन ऐशोआरामात वाढलेला आमचा "भाई" नाही सर्वसामान्यांचे जिवन आणि अपुरे जेवण ह्या दोन्ही गोष्टी स्वतः भोगून ते समाजकार्यात उतरले होते. 
म्हणून त्यांना जाण होती सामान्य माणसांच्या व्यथांची. "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या" विचारांनी प्रेरीत आणि समाजात चटके खाऊन तयार झालेला हा "हिरा" खरोखरच "कोहिणुर" होता. परिस्थिती बेताची त्यात आता दोनाचे चार हात झाले होते. 
त्यामुळेच सर्वसामान्याप्रमाणे "भाई" मुंबापुरीत आले. शहरात जरी अनोळखी ठिकाणी आला असला तरी 'शेर को इलाका बनाना सिखाना नही पडता'. तसंच आपल्या कर्तृत्वाने अवघ्या काही काळातच मुंबई, सातरस्ता, चारचाळीत पँथर स्थिरावला. 

महापुरुषांना डोक्यावर घेण्यात भाईंना रस नव्हता उलट त्यांचे विचार समजून घेण्याची त्यांना विशेष रुची होती. वाचनाची भारी आवड असल्याने "बौध्द" धम्माचा विशेष प्रभाव त्यांच्यावर होता.ते नेहमी आपल्या भाषणात सांगत कि, अखिल विश्वात असे एकच महापुरुष होऊन गेले ज्यांनी सांगीतलं मी बोलतो आहे ते सत्य नाही सत्य तेच आहे जे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसतं, अनुभवता येतं आणि त्याप्रमाणेच समाजात जे सत्य त्यांना दिसत होतं अनुभवायला मिळत होतं त्याविरोधात ते परखडपणे भाष्य करीत होते असे परखडपणे भाष्य करणारे "भाई" त्यावेळचे एकमेव नेते होते.
भाषणशैली कशी असावी ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "भाई"."भाईंच्या"भाषणाच्या रेकॉर्डेड कॅसेट ऐकुण कित्येक बाळं बोलायला शिकली,भाईंच्या सावलीत कित्येक नेते चालायला शिकले.भाई फक्त मंचकावरचा बोलघेवडा वक्ता नव्हते. कित्येकवेळा रस्त्यावरच्या आंदोलनात ते स्वतः अग्रेसर होते. 

सरकार विरोधात मुंडण करून निदर्शने करण्यात असो किंवा जेलभरो आंदोलन करण्यात असो भाई नेहमीच रस्त्यावर उतरून लढायचे. 
उंटावरून शेळ्या हाकायला भाईंना कधी जमलं नाही. 'जयभिम के नारे पे खुन बहे तो बहने दो' ह्या घोषणे प्रमाणेच त्यांचे रक्त सांडले तरी ओठातून जयभिम चा नारा सुरूच होता,सर्वत्र निनादत होता.

अजुनही कानात त्यांचा ध्वनी ऐकू येतो आणि आम्हाला प्रेरीत करतो. मंचकावर ज्यावेळी ही तोफ डागली जायची तेंव्हा भल्याभल्यांना पळता भुई थोडी व्हायची ह्या एकाच तोफेच्या आवाजाने महाराष्ट्राबरोबरच संपुर्ण "देश" हादरत होता.त्यांच्या भाषणातील शब्द अजूनही तोफेसारखाच प्रभाव पाडतात. 

        भाई म्हणतात... 
        बालाजी च्या रक्षणासाठी मिलिटरी फोर्स....! 
        जब भगवान का संरक्षण इन्सान करेंगे.....! 
        तब भगवान क्या करेगा....   ?
       
हेच सांगण्यासाठी निर्मात्याला करोड रुपये खर्च करुन P. K. आणि O. M. G. सारखे चित्रपट करावे लागले. एका वाक्यात खुप काही सांगून जाण्याचा गुणधर्म त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता ह्याची प्रचिती तुम्हाला त्यांच्या प्रत्येक भाषणात येईल. 


        त्यांनी म्हणायचं बैल गाभण ......
        तुम्ही म्हणायचं तेरावा महिना  ......
        सध्य परिस्थिती मध्ये असंच चाललय कोण म्हणतं २५० मेले कोणी म्हणतं ३०० तर कोणी म्हणत ४०० आणि भक्त म्हणतात "जय हिंद" ! 
        पुरावे मागायला गेलं तर देशद्रोही 
        "पागलोंके बाजार मे पत्थरों का व्यापार".....!

        अशी त्यांची २० वर्षापूर्वी केलेल्या भाषणातील काही वाक्य सध्य परिस्थितीला तंतोतंत जुळतात. आणि त्या वक्तृत्वाचा ठसा आम्हा तरुणांच्या मनावर जशाचा तसा उमटला आहे.

        "पँथर" ! पँथर बरोबर भाई हे नाव असं जोडलेलं आहे जसं दिव्यासोबत वात.पँथरचा दरारा, दहशत त्यांनी गाजवलेला काळ आजही आठवतो दोन शिलेदार त्यातील   

        एक कवी असा ज्याच्या लेखणीला तोड नाही.....! 
        एक वक्ता असा ज्याच्या डरकाळीला जोड नाही....! 

एकाने भाषेचा मदमस्त हत्ती पेनाच्या अंकुशाने काबूत केला होता तर एकाने पट्टेरी वाघांना डरकाळीनेच घाम आणला होता. हि होती दहशत हा होता दरारा पँथरने मनुवादाला पार हादरून सोडलं होतं. 

भाईंनी १९९८ ला शिवशक्ती भिमशक्ती च्या निमित्ताने ठाण्यात जे भाषण केलं होतं त्याचा विशेष प्रभाव माझ्या जिवनावर झाला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांचे भरभरुन कौतुक केल्यानंतर सेनेचे मोठेमोठे नेते मंचकावर असताना मुलूखमैदानी तोफ धडाडली 
           शिवशक्ती म्हणजे शंकराची शक्ती...? 
           शिवशक्ती म्हणजे "छत्रपतींची" शक्ती.....? 
           शिवशक्ती म्हणजे सेनेची शक्ती......? 

असा थेट सवाल भाईंनी उपस्थित केला.सेना ही "महाराजांची" सेना आहे हा गैरसमज आहे.असे ठणकाऊन सांगीतले.सेनेला वैचारिक अधिष्ठान आहे का असा प्रत्यक्ष प्रश्न विचारला."संगतीला सगळे पंगतीला वेगळे."असा मार्मिक चिमटा सुध्दा काढला.

'सत्तेसाठी लक्ष ठेवून केलेली युती हि बाजारबुणग्यांची युती होते' खिशात राजीनामे घेऊन फिरणार्यांची औकात त्यावेळीच ओळखून जनतेला सावध करणारा निर्भिड आणि फर्डा वक्ता म्हणजे "भाई".आम्ही शिवशक्ती भिमशक्ती युतीसाठी तयार आहोत परंतु हिंदुत्व सोडावं लागेल !  असं विरोधकांच्या मंचावर डोळ्यातडोळे घालून बोलणारा नेता आपण २० वर्षांपूर्वी गमावला आहे ह्याची खंत आहे.

आमचे "प्रेरणास्थान शहिद भाई संगारे" देहात प्राण असेपर्यंत कोणाच्याही दावणीला बांधला गेला नाही नाहीतरी दावणीला बांधला जातो त्याला पँथर म्हणणार कसे? दावणीला तर बैल बांधले जातात. 
म्हातारी मेल्याचे दुखः नाही काळ सोकावतोय! 
त्यांनी सरळ बोलावं त्यातही मिश्किल गोष्टींचा, म्हणींचा वापर त्याही सर्वसामान्यांना कळेल अशा म्हणूनच त्यांच्या भाषणाला लोक दूरवरून यायचे तुफान गर्दी व्हायची.श्रोते स्तब्ध होऊन ऐकत बसायचे.

म्हणतात कि दोन वाघ एका ठिकाणी राहु शकत नाहीत परंतु सातरस्ता विभाग ह्याला अपवाद होता कारण ह्या एकाच ठिकाणी दोन वाघ राहत होते एक "भाई संगारे" "भाई" आणि एक "अरुण गवळी" "डॅडी" दोन्ही वाघातील गुणधर्मात साम्यता होती दोघांनी कधीही गरीबांना त्रास दिला नाही आणि खास म्हणजे कोणाच्या बापालाही घाबरले नाहीत. 

विवेक बुध्दी गहाण ठेवलेल्या एका कवीने आपल्या पिताश्री च्या गुणगान लेखात भाईंच्या कॉलर ला हात घालण्याचा संदर्भ दिला आहे वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणार्या, नावानेच "भाई" असलेल्या माणसाच्या कॉलर ला ते हयात नसताना हात घालणाऱ्या बालीष बुद्धीच्या लेखकाची मला किव येते. ज्याच्या कॉलरला स्वयंघोषित ह्दयसम्राट सुध्दा हात घालायला घाबरत होते त्यांच्या कॉलरला हात घातला म्हणे.
      
अजुनही काही स्वयंघोषित विद्वान मनुपुराण गात असतात त्यात काही डावरी हि आहेत म्हणतात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली असताना भाईंना ती पुन्हा जाळण्याची काय गरज होती ? अशा निर्बुद्ध मानसांना मला सांगावंसं वाटतं कि, उद्या तुम्ही हा सुद्धा प्रश्न विचाराल बुध्दांनी तर धम्म सांगीतला होता बाबासाहेबांना पुन्हा सांगण्याची काय गरज होती ?  

लेकहो तुम्हाला काही गोष्टी सरळ आणि एकदा सांगुन कळत नाहीत. तसं जर का असतं तर तुम्ही आजही मनुपुराण गात नसता वर म्हणायचं नीट वाचा आणि अर्थ लावा. 

बेअक्कल लोकांना एवढच सांगायचं आहे कि विश्वात कोलंबिया सारख्या विद्यापीठातील एकमेव सर्वश्रेष्ठ विद्यार्थी, जगातील सगळ्यात तल्लख कायदेतज्ञ, ज्ञानाची ओळख (The symbol of knowledge)  त्यांच्या डीगर्या वाचताना तुमच्या सारख्यांना धाप लागते.

अशा महामानवाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी" मनुस्मृती प्रथम जाळली म्हणजे ह्यांना असं म्हणायचं आहे का कि, महामानवाने ती नीट न वाचताच जाळली. 

अरे लाज वाटायला हवी हरामखोरांनो ज्याला मुलाच्या शालेय पाठ्यपुस्तकात काय लिहीलं आहे ह्याचा नीट अर्थ लावता येत नाही त्याने हे बोलने म्हणजे 'काजव्याने सूर्याला प्रकाश दाखविण्यासारखे आहे'. राहीला प्रश्न भाईंनी का जाळली? पँथर जेंव्हा मनुवादा विरोधात संघर्ष करत होता त्यावेळी १९२७ ला जाहीर मनुस्मृती जाळली असताना राजस्थान मधील जयपुर उच्चन्यायालया (high court) बाहेर ३ मार्च १९८९ मध्ये मनुचा पुतळा उभा करण्यात आला त्यामागचं कारण काय होतं ? मनुवाद पुन्हा डोकं वर काढत होता आणि "भाई म्हणजे बाबासाहेबांचा वैचारिक वारसा असलेले पँथर, त्यागोष्टीला विरोध म्हणून भाईंनी मनुस्मृती दहनाचा जाहीर कार्यक्रम हाती घेतला. 

त्या कार्यक्रमात भाई अपघाती भाजले असा निष्कर्ष प्रशासकीय अहवालात आहे ते म्हणतात कि एवढ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत जनसमुदाय असताना कोणी कटकारस्थान करण्याची हिम्मत सुध्दा करणार नाही परंतु दुसर्‍या बाजुला कार्यकर्त्यांमध्ये अशी सुध्दा चर्चा होती कि त्यांच्या सदर्यावर गर्दीचा आधार घेऊन ज्वलनशील इंधनाचा फवारा हळूहळू करण्यात आला घामामुळे भाईंच्या ते लक्षात आलं नाही आणि त्यामुळेच कपड्याने आग पकडली.काही लोक असंही म्हणतात कि ते पूर्वनियोजित होतं भाईंच्या सहकार्यांनी तसा सावधतेचा इशाराही त्यांना महाडला जाण्यापूर्वी दिला होता परंतु पँथर पीछे हटणारा नव्हताच "शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जग" हे बाबासाहेबांचे वाक्य त्यांना आठवलं त्याचा परिचय दाखविण्यासाठी भाई धोका माहीत असताना सुध्दा महाडला गेले.

कार्यकर्त्यांचा ताफा सोबत होता आजुबाजुला गर्दी होती भाईंनी एकनजर सर्वांकडे पाहीलं बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि मनुस्मृती ची प्रत पेटवली तत्काळ सदर्याने पेट घेतला जनसमुदायाची तारांबळ उडाली आपला नेता पेटलेला बघुन काहींना काही करावं सुचलं नाही त्यातही निकटचे सहकारी ह्यांच्या प्रयत्नाने आग विझवण्यात आली त्यात मनोजभाई संसारे सारख्या सहकार्यांचे हात भाजले परंतू त्यांनी त्याची तमा केली नाही त्वरीत भाईंना मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टर, नर्स, वार्डबॉय संपुर्ण चारचाळ, लवलेन, माझगाव, लालबाग, परळ संपुर्ण मुंबईतील पँथर दवाखाण्यात जमले तत्काळ उपचार सुरु झाले. 

त्यादरम्यान अचानक त्याना जस्ट लोक ला शिफ्ट करण्याचा निर्णय कोणी व का घेतला ह्याबाबत अजुनही लोकांच्या मनात प्रश्न उभा राहतो. 

तब्बल १२ दिवस मृत्यूशी झुंज देणारा पँथर १ एप्रिल १९९९ ला शांत झाला सगळीकडे प्रसारमाध्यमांतून बातमी वाऱ्यासारखी पसरली सर्वप्रथम लोकांना विश्वासच बसत नव्हता १ एप्रिल असल्याने कोणी आपली एप्रिल फूल करत असावं असंही वाटत होतं परंतू ह्याउलट निसर्गानेच आमची एप्रिल फूल केली होती.

हिराऊन नेला हिरा आमचा केलं आम्हाला पोरकं...... आहेत स्वयंघोषित नेते कित्येक पण कोणी नाही तुमच्या सारखं......... तुमच्या भाषणातील प्रत्येक गोष्ट आम्हाला खुणावते...... आजही चुकत असलो तर खडे बोल सुनावते......

एका धगधगत्या ज्वालामुखीचा शेवट व्हावा तसाच ह्या पर्वाचा शेवट झाला होता. 

"बाबासाहेबांच्या" महापरिनिर्वाणा पश्चात एवढा जनसमुदाय अंतयात्रेत सहभागी होताना कित्येकांनी अनुभवला आहे. काय सांगुन गेले "भाई" त्यांच्या प्रवासातून आपल्याला कि कितीही कठीण प्रसंग आला तरी "बाबासाहेबांच्या" विचारांशी तडजोड करु नका! एवढंच! बहुदा तेच सत्य स्विकारणे देशाला जड जात आहे. 

त्यांना देशहिताचे विचार नको त्यांना धर्मजात आणि स्वहिताचेच पडले आहे. १ एप्रिल १९९९ हा दिवस मन हेलावून टाकणारा होता. 

एका पर्वाचा शेवट व्हावा तसा हा देह विसावला होता भाईंच्या भाषणांचा प्रतिध्वनी जणू जिल्हयाजिल्ह्यात गावागावात घुमत होता लोक हायमोकलून रडत होते सगळी कडे आक्रोश पसरला होता लोकं व्हीव्हळत होती "चार चाळीची शान गेली" आमचा आधार गेला  ! पळसुंद्याच्या वाघाची डरकाळी आता पुन्हा ऐकायला मिळणार नव्हती.

धगधगणारी तोफ आता शांत झाली होती पण हि तोफ लाखो तरुणांच्या मस्तकात क्रांतीचा बारुद पेरून गेली. इथे सगळं संपतं असं नाही मानुस मारता येतो त्याचे विचार मारता येत नाहीत. आता तरुण त्यांचा वैचारिक वारस म्हणून त्याच मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज आहेत.

मानसाचा अंत होतो विचारांचा अंत होत नाही! 
मी पणाची,सत्तापीपासुपणाची,खेकडावृत्तीची झापडं डोळ्यावरून बाजूला सारुन बघा प्रत्येक तरुणात तुम्हाला "भाई संगारे" दिसतील.

        डरकर भाग जाना हमारी फितरत मे नही
        तुम एक को मारोगे सामने हजार पाओगे
        शहादत तो हमारे खुन मे है
        पँथर कोई डोर नही जो तोडणेसे टूट जाए
        ये तो फांसी का फंदा है
        डरना मत इन देश के दूश्मनोंसे क्योंकी , 
        "पँथर" अभी जिंदा है. 
   
"भाई" जिवंत आहेत तरुणांच्या मनात, विचारांत आणि सदैव जिवंत राहतील.
       
"पँथर इज बॅक" 
 सम्राट भाई संगारे.
पँथर इज बॅक सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक  
दलित पँथर मुंबई अधक्ष्य

न्यूज 24 खबर ची पूर्ण टीम पँथर च्या चरणी नतमस्तक होऊन आदरांजली वाहते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools