खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

शिक्षणाचा बाजार - श्रीकांत माने

शिक्षणाचा बाजार

            मित्रांनो आपण प्रत्येक जण शाळेत गेलोय आणि असा एकही व्यक्ती नाही ज्याने "माझी शाळा" ह्या विषयावर निबंध लिहिला नसेल, अस मला वाटत. किती छान दिवस होते ते, आजही अस वाटत ते दिवस, ते मित्र मैत्रिणी परत यायला हवेत, ते गुरुजी आणि त्या खडूस बाई परत आपल्या आयुष्यात यायला हवेत कारण तेव्हा शाळा म्हटलं की नको असा रट्टा असायचा. पण आज अस वाटतं तेच दिवस छान होते. " Those are golden days"
           लहानपणापासून ऐकतोय " शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पियील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही" पण जसजसं वाघ भारतातून कमी होतायत तसतसे हे दूध महाग होत चाललंय.आज मी आणि आपण सगळेच बघतोय शाळा आता संपलिये आणि जन्म घेतलाय स्कूल, नर्सरी, एल केजी आणि युकेजी ने आज घरूनच डब्बा न्यावा लागतोय आणि एक आम्ही होतो फक्त खिचडी आणि सुकडी मिळणार म्हणून शाळेत जायचो. आजकालच्या मुलांना सूकडी हा शब्द तरी माहितीये का? हा मोठा प्रश्न आहे. पण आज ही मुलं हे सगळं का विसरलीत? कारण काय? कारण आहे शिक्षणाचा बाजार. आज कित्येकांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे आणि त्याच बाजारात आपण आपली मुले पाठवतो. काय ते दिवस होते गुरुजी आणि बाई यांच्या हातून मार खायला नको म्हणून आपण सगळा गृहपाठ पूर्ण करून जायचं आणि आज मॅडम होमवर्क देतात आणि तो सुद्धा ही मुलं पूर्ण करत नाहीत तो आपल्याला पूर्ण करून घ्यावा लागतो नाही तर क्लास वाला तर आहेच करून घ्यायला. हा आहे बाजार अस्सल बाजार पैशांवर चालणारा आणि सत्तेपुढे झुकणारा या बाजारात तुमचे स्वागत आहे.
            आज या शिक्षणाच्या बाजारात आपण आपली मुले शिक्षणासाठी पाठवतो! की विकतो हाच मोठा प्रश्न आहे आजकालच्या मुलांना आधी स्कूल मग ट्युशन मग क्लासेस अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते पण ह्याला जबाबदार कोण? आपण? की शिक्षण संस्था की ट्युशन संस्था ह्या जबाबदार आहेत? तुमच्याकडे उत्तर असेल तर मला नक्की सांगा कारण मला तरी अजून ह्या गोष्टीचे उत्तर मिळाले नाही. फार विचार केला एक काळ आमचा होता जेव्हा आम्ही फक्त खिचडी आणि सुकडि मिळेल ह्या आशेपायी बालवाडीत जाऊन बसायचो. आणि तेही फुकट मिळायचं, आज बालवाडी तर संपली त्याची जागा एलकेजी आणि युकेजी आणि नर्सरी यांनी घेतली. बालवाडी त्यावेळी फुकट होती आज नर्सरीला एका लहान मुलाच्या शिक्षणासाठी हजारो रुपये मागितले जातात, का? का मागितले जातात? शिक्षण आहे ते, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू राजे यांनी आम्हाला शिक्षण घेण्याचा हक्क दिला, आणि तोही कमी पैशात पण आजच चित्र वेगळ आहे.

                 आज कित्येक जण आपापली शिक्षणाची दुकान घेऊन उभी आहेत. त्या दुकानात शिक्षणाची किंमत लावली जाते, बोली लावली जाते आणि जो जास्त बोली लावेल त्याला ते शिक्षण मिळते. हे कुठपर्यंत? आज झेडपी च्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचा मुलगा कॉन्व्हेंट स्कूल मध्ये जातो पण त्याचा बाप किंवा त्याची आई ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेत त्याला शिकवले जात नाही. मग सरकारी काय फक्त नोकरीसाठी पाहिजे शिक्षणासाठी नको? विचार करा हातावर काम करणाऱ्याचा मुलगा कधी तरी मोठ्या कंपनीत कामाला लागतो किंवा सरकारी नोकरीला लागतो तो कुठे शिकलेला असतो मराठी शाळेतच ना? कारण त्याचा बाप कॉन्व्हेंट स्कूल ची फी भरण्यास असमर्थ असतो.  

                  आज जी मंडळी आपल्या मुलांना कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये टाकतात ती सर्व मंडळी मराठी शाळेत शिकलेली आहेत. नाही माझा कॉन्व्हेन्ट शिक्षण घेण्यास विरोध नाही, पण त्यांची फी ही सामान्य माणसाला परवडणाऱ्या जोगी आहे का? शिक्षणाचा सगळा बाजार भरवलाय ह्या लोकांनी. १ ली, २रीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ७०, ८० हजार रुपये फी! कमाल आहे. एवढे तर आम्हाला पूर्ण १२ वी होऊन सुद्धा उरले असते. हे काय आहे बाजारच ना. हे कमी होत म्हणून की काय स्वतःचे दुकान सुद्धा चालू केले या मंडळींनी काय तर म्हणे ड्रेस आमच्याकडून, बुक आमच्याकडून ( ते पण विकत), शूज आमच्याकडून पण डब्बा घरून आणायचा. अरे आम्ही खिचडी साठी दररोज शाळेत जायचो रे.

                  ह्या मंडळींनी पूर्ण लाजा सोडून ही दुकान उघडलियेत हेच खर. बर ह्या स्कूल मध्ये सर्व शिकवतात मराठी सोडून! काय चेष्टा आहे. आज आम्ही बघतोय मुलांना इंग्रजी फार छान येत पण मराठी नाही. मातृभाषेला दूर लोटून शिक्षण द्यायची ही कोणती पद्धत. ( हे सर्व पाहिलय म्हणून लिहिलंय याबद्दल दुसर मत असू शकत) मुलांनी कॉन्व्हेन्ट शिक्षण जरूर घ्यावं. पण मातृभाषेचा अभिमान असण गरजेच आहे. राहिला फीचा विषय तर ते सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटत आपल बाळ शिकून फार मोठं व्हावं पण कसलं काय. ही बाजारू मंडळी फक्त कमवायला बसलियेत. 

                 त्यात भर म्हणून ह्यांचे सख्खे बंधू क्लास वाले ह्यांची तर वेगळीच तऱ्हा विषयानुसार पैसे. अरे झेडपी च्या शाळेत जाऊन बघा १ गुरुजी किंवा एक बाई सगळे विषय शिकवतात ते ही एकच पगारात. हे सगळं बघून फार चीड येते पण आपली जनता अजूनही झोपलेली आहे आणि जनता अशीच झोपलेली राहिली की ही मंडळी आपली अशीच लूट करत राहणार. आपण इतके षंढ आहोत का? आपणच आपली लूट होऊ द्यावी ती ही स्वईछेने? कुणालाही त्रास नाही. म्हणजे ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी संपूर्ण आयुष्य फक्त लोकांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि ते ही थोड्या पैशात यांसाठी पूर्ण आयुष्य घातल त्यांचं आयुष्य सार्थकी लागल अस कस म्हणता येईल. जे ज्योतिबा फुले समाजाचा विरोध पत्करून स्त्रीशिक्षणाच्या बाजूने ठाम उभे राहिले ते चुकले का? हेच प्रश्न आज या महापुरुषांना पडत असतील. ज्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं त्याचं शिक्षणाचा आज हा बाजार बघून त्यांच्याही मनाला वेदना होत असतील.

                 हा झाला पूर्वार्ध खरी गोम तर पुढे आहे कुठलीही पदवी मिळवण्यासाठी आज डोनेशन हा प्रकार फार चर्चेत आहे. डॉ. साठी ५०, ६० लाख इंजिनिअरिंग साठी २५, ३० लाख आणि इतर ५, ७ लाख इतके पैसे फक्त डोनेशन म्हणून. काय ही अवस्था कुठलही राज्य, कुठलाही देश हा फक्त शिक्षणामुळे पुढे जातो. आणि आपल्याकडे शिक्षणच विकल जातंय हे दुर्दैव. डोनेशन का? असा प्रश्न विचारला तर आरक्षण हे कारण पुढे केले की झालं. आज पर्यंत आरक्षण आणि डोनेशन ह्यांचा संबंध कुणीही दाखवू शकले नाही कारण मुळात संबंध नाहीच. फक्त पैसे कमावण्यासाठी ही मंडळी हा संबंध लावतात आणि आपली पोळी भाजून घेतात. विशेष म्हणजे ही मंडळी दुसरी तिसरी कुणी नसून आपणच निवडून दिलेले बुजगावणे आहेत. हेच बुजगावणे आपल्याला आज लुटतायत.

                असच चालू राहील तर भविष्यात शिक्षणावर फक्त श्रीमंत वर्गाचं वर्चस्व असेल आणि गरीब माणूस तुकड्यांवर जगेल हेच खर. त्यामुळे आपली मराठी शाळा वाचवा. आपल्या मराठी शाळेने आज पर्यंत किती मोठमोठे लोक घडवलेत. पूर्ण भारताचे आदर्श डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब सुद्धा कुठल्या तरी झेडपी च्या शाळेत शिकले आहेत हे लक्षात ठेवा. शिक्षणाने माणूस मोठा होतो हे खरे आहे. ह्या शिक्षणाचा बाजार थांबला तरच मोठी माणसं तयार होतील नाहीतर मोठीच माणसं मोठी होत राहतील. सरकार कडून अपेक्षा सोडून द्या कारण सरकारमध्ये असणारेच भरपूर लोक ह्या बाजारात दुकान मांडून बसलेले आहेत. त्यामुळे जे काही करायचे आहे ते सामान्य लोकांनाच करायचे आहे.

               शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि ज्या महापुरुषांनी ह्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचले ते वाया जाऊ देऊ नका. शिक्षण घेण्यासाठी वाढलेल्या अवाजवी फी विषयी भांडा. तरच आपल्या पुढच्या पिढीचे जीवन सुखकर होईल. नाही तर आहेच १ लाख रुपये पहीलीसाठी आणि १० हजार रुपये प्रत्येक विषयाचे क्लासेस साठी. ज्याची त्याची मर्जी.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools