उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दिन शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मागील काही वर्षांपासून ख्रिश्चन धर्मीयांवर होणारे हल्ले, ख्रिश्चन मंदिराची (चर्च) ची नासधुस करणे, तोडफोड करणे, जाळपोळ करणे, ख्रिश्चन धर्मगुरूंवर व त्यांच्या कुटुंबावर जिवघेणे हल्ले करणे, मंदिराची विटंबना करणे, ख्रिश्चन मंदिरामध्ये घुसून उपासनेमध्ये व्यत्यय आणणे व उपासनेसाठी मनाई करणे. तसेच त्यांच्यावर प्रलोभन देऊन धर्मांतर करणे यासारखे बिनबुडाचे आरोप करणे. अशा प्रकारे ख्रिश्चन धर्मीयांना समाज कंटकांकडुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ख्रिश्चन धर्मगुरूंवर विनयभंगासारखे खोटे-नाटे आरोप करून गुन्हे नोंदवितात. समाजात त्यांची बदनामी करणे असे प्रकार स-हास होत आहेत. याबाबत राहुरी तालुक्यात अनेक घटना घडलेल्या आहेत. काही कट्टरपंथीय गट व संघटना जाणून-बुजून ख्रिश्चन धर्मीयांना लक्ष्य बनवित आहेत.
कुठल्याही प्रकारचे प्रलोभन व पैसे देऊन कोणतेही धर्मांतर करत नाही. आजही आम्हा ख्रिश्चन लोकांची आर्थिक सत्य परिस्थिती ही सरकार समोर आहे.
आम्ही या देशाचे मुळनिवासी नागरिक आहोत. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारात राहून ख्रिश्चन समाज आपले जीवन जगत आहे. प्रत्येकाला धर्माचा प्रसार, प्रसार व उपासनेचा अधिकार हा भारतीय राज्य घटनेने दिलेला असतानाही ख्रिश्चन धर्मीय नागरिक हे संख्येने अल्प असल्यामुळे मुद्दामहून जबरदस्तीने धर्मांतराचे खोटे व बिनबुडाचे आरोप करून संघटीत दडपशाही व मुस्कटदाबी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात सुरू केले आहेत.
घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होताना दिसत आहे. अनेक राजकीय नेते विधानसभेत व परिषदेत खोटे व सिध्द न होणारे आरोप करून आमचा धार्मिक उपासनेचा हक्क व अधिकार हिरावून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. धर्माधर्मात व जातीजातीत तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा व सामाजिक शांतता भंग करू पाहत आहे. सध्याचे वातावरण हे ख्रिश्चन धर्मियांना असुरक्षित करणारे झाले आहे. ख्रिश्चन धर्मियांना सतत अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे.
ख्रिश्चन धर्मियांना न्याय व घटनेने दिलेले हक्काचे व अधिकाराचे जीवन जगण्यासाठी योग्य ते उपाय व प्रतिबंध व्हावेत. ख्रिश्चन धार्मिक स्थळांना व उपासना मंदिरांना संरक्षण मिळावे. ख्रिश्चन धर्मियांवर होणारे हल्ले रोखण्यात येऊन खिश्चन धर्मियांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरां विरूध्द् योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालूकाध्यक्ष विलास साळवे, वंचित चे जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा नेते निलेश जगधने, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मोर्चाला पाठिंबा दिलाय.
यावेळी बिशप मॅनल गायकवाड, फादर सतिष कदम फादर ऑलविन फादर मायकल राजा पास्टर कैलास मकासरे, दिपक थोरात, बाळासाहेब बोर्डे, दिपक चक्रे, मेघा गायकवाड, प्रदिप हिवाळे आदिंसह शेकडो खिश्चन बांधव उपस्थित होते.
0 Comments