कळंब - सर्वच क्षेत्रातील कलावंत -कामगार-ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर बहुजन परिषदेत ठराव मंजूर करण्यात येऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरले.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कसबे तडवळे येथे २२, २३ फेब्रुवारी १९४१ रोजी घेतलेल्या महार-मांग वतनदार परिषदेच्या ८३ व्या वर्धापनदिनी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधत प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था कळंबच्या वतीने दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील विरंगुळा केंद्रात स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेचे प्रमुख पाहुणे महादेव महाराज आडसूळ यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचे वय केंद्र शासनाच्या जी.आर. प्रमाणे करून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनानी करावी, प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांनी जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करून त्यामध्ये मनोरंजनाची साधने उपलब्ध करावीत, प्रत्येक नोकरदाराच्या पगारातून किंवा उत्पनातून १५% रक्कम प्रति महिना आई-वडिलांच्या नावे जमा करण्याचा कायदा करावा, ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना १० हजार रुपये पेन्शन द्यावी व ज्येष्ठांना औषधोपचार मोफत द्यावा, प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात ज्येष्ठांना त्यांच्या कामासाठी प्रथम प्राधान्य द्यावे असा ठराव मांडला.
राष्ट्रीय प्रबोधनकार शाहीर राणा जोगदंड यांनी ग्रामीण व शहरी कलावंतास मिळणारे मानधन तुटपुंजे असून त्यामध्ये वर्गवारी नुसार दहा हजार,सात हजार व पाच हजार रुपये प्रति महिना वाढ करावी, त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल बांधून द्यावे, घरकुलाची रक्कम शहरी व ग्रामीण एकसारखी करावी, कलावंताच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे असा ठराव मांडला तर राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सचिव अच्युत माने यांनी प्रत्येक क्षेत्रातील कामगार भरती कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी करावी, कामगारांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा मोफत द्यावी, कामगारांच्या व्यवस्थापनातील मनमानीवर शासनाने अंकुश ठेवून कामगाराची वरिष्ठाकडून होणारी पिळवणूक थांबवावी असा ठराव मांडला. तिन्ही ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन अध्यक्षीय समारोपातून सुभाष घोडके यांनी दिले.
स्वराज इंडियाचे कळंब शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत यांनी बहुजन परिषदेच्या प्रस्तावनेत कसबे तडवळ्याचे ऐतिहासिक महत्त्व व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे कार्य विशद केले तर महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे सचिव संत सुफी सय्यद, लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्कर सोनवणे, पुरोगामी विचारवंत प्रल्हाद पांचाळ, व्ही.व्ही.दशरथ, प्रा.महादेव गपाट आदींनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर आभार ज्ञानदा संस्थेचे बंडू ताटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments