खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

आपण नामदेवला विसरलो तर नाहीना

आज मला 'शोले' चित्रपटातील ए.के. हंगल ह्यांच्या डायलॉग ची 'इतना सन्नाटा क्यों है भाई' आठवण झाली. 

ज्या ढसाळांनी आंबेडकरी चळवळ वेगवेगळ्या गटाच्या राजकारणापायी विखुरलेल्या मृतप्राय अवस्थेत असताना 'दलीत पँथर' नावाची लढाऊ संघटना काढून प्रस्थापितांना टक्कर देत, अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन उग्र आंदोलने करीत,

काही वेळा पोलिसांचा मार खात, अनेक केसेस अंगावर घेत, मरगळलेल्या समस्त आंबेडकरी समाजात नव संजीवनी फुंकून समाजात अन्याय अत्याचार विरोधात लढण्याचे स्फुल्लिंग पेटवून जान आणली, ज्यांचे शब्द कानात साठवण्यासाठी आंबेडकरी समाज रात्री दोन दोन वाजेपर्यंत सभास्थानी ताटकळत बसत होता, ज्याने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून समाजाच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सरकारला भाग पाडले, 

ज्याने 'गोलपिठा' ह्या काव्यासांग्रहातून कवितेची मळकट वाटच बदलून बोलीभाषेतील शब्द त्याच्या अर्था संदर्भासह देखील कवितेत चपखल बसू शकतात हे सिद्ध केले, ज्याने आईचा महिमा अधोरेखित करण्यासाठी पहिल्यांदा 'नामदेव साळूबाई ढसाळ' असे नामाभिधान धारण केले, 

ज्याला चळवळीतील कार्यकर्त्यांनी 'साहेब' म्हंटले म्हणजे इंगळी डसल्या सारखे वाटायचे, आणि नामदेव किंवा नाम्या म्हटल्यावर आनंदी दिसायचा, अशा आणि ईतर कितीतरी अशक्य गोष्टी ज्याने लीलया करून दाखविल्या, त्या एकेकाळी समस्त दलीत व पुरोगामी चळवळीच्या गळ्यातील ताईत असलेल्या लाडक्या नाम्याच्या स्मृतिदिनी इतकी शांतता कशी? समाज इतक्या लवकर दादांना विसरला की काय? समाजाचे एक वेळ बाजूला राहू द्या. 
परंतु दादांचे बोट धरून जे लोक पँथरच्या चळवळीत येवुन आज सत्तेची चव चाखतात त्यांना देखील दादांची आठवण येऊ नये यापेक्षा दुर्दैव ते कोणते? असे तर नाही ना की, त्या काळातील सगळेच पँथर काळाच्या पडद्याआड गेले? की त्यांचे विचार, चळवळ आजच्या पिढी पर्यंत पोहोचलीच नाही? नक्की काय झाले, हा एकूणच दलीत चळवळीच्या दृष्टिकोनातून चिंतनाचा विषय आहे असे मला वाटते. 


आणि हा विचार मनात येऊन माझ्या तर कल्पनेनेच पोटात गोळा आला. परंतु का कुणास ठाऊक? असेही वाटते की, भविष्यातील ह्या फास्ट जीवनशैली विषयी त्यांना अगोदरच समजले असावे म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीतच लिहून ठेवले आहे की, 'सर्व काही समष्टिसाठी'.
नामदेव लक्ष्मण ढसाळ ह्यांचा जन्म दिनांक १९/०२/१९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पुर या गावात झाला. मुंबईत त्यांचे वडील व्यवसायाने खाटीक होते व राहायला गोलपिठा या वेश्यावस्तीतील झोपडपट्टीत होते. तिथेच दादांचे बालपण जाऊन तरुणपणी ते टॅक्सी ड्रायव्हर झाले. साधारण सत्तर बहत्तरच्या दरम्यान दलीत, व महिलांवरील अन्याय अत्याचार चरम सीमेवर पोहोचला होता. माझ्या आठवणी प्रमाणे नाशिकच्या गवळी बंधूंचे डोळे काढल्याचे प्रकरण त्याच काळी घडले होते. त्यामुळे सकल समाज अस्वस्थ होता, आतल्याआत धुमसत होता राजकारण्यांच्या आपापसात लाथाळ्या चालू होत्या. त्यामुळे समाज सैरभैर झाला होता. अशा वेळी अमेरिकेतील ब्लॅक पँथर ला आदर्श ठेऊन दलीत पँथर ही अतिशय लढाऊ तरुणांची संघटना ज.वी. पवार ह्यांच्या सह इत्तर सहकार्यांना घेऊन १९७२ साली स्थापन केली.

जिथे दलितांवर, स्त्रियांवर अन्याय, अत्याचाराची घटना घडली की, हे लोक प्रत्यक्ष जाऊन आंदोलन करून सरकारला संबंधित लोकांविरुदध कार्यवाही करण्यास भाग पाडू लागले. त्यामुळे ते अल्पावधीत समाजाच्या गळ्यातले ताईत झाले. त्याकाळी शिवसेनेचा मुंबई मध्ये प्रचंड दरारा असताना त्यांच्याशी दोन हात करण्याचे धाडस वरळीच्या दंगलीच्या रूपाने करून दाखवले. आणि त्यांना टक्कर देणारी देखील ताकद मुंबई, महाराष्ट्रात आहे हे दाखवून दिले. त्यावेळी अर्जुन डांगळे व दादांचा केसाला धरून पोलिस मारीत असल्याचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याचे माझ्या स्मरणात आहे. नंतरच्या काळात पँथरच्या विस्तार देशभर झाला. परंतु आपण एकसंघ राहणे प्रस्थापितांच्या दृष्टीने धोकादायक असावे म्हणून ते कधीच आपल्याला एकत्र येऊ देत नाहीत, असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे पुढील काळात पंथरमध्ये फूट पडून एका लढाऊ संघटनेचे तीन तेरा वाजले.

दादांनी स्तंभलेखन, कविता, गद्य लेखन ह्या मार्फत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या 'गोलपिठा' ह्या काव्यसंग्रहास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यातील शब्द प्रस्थापितांच्या खाजगी मध्ये देखील उच्चारण्यास वर्ज्य असूनही, त्यांनी त्या शब्दांना कवितेत जागा देऊन प्रतिष्ठित केले. म्हणूनच तर राज्य शासनाने त्या कविता संग्रहास पुरस्कार दिला. त्यांचा इंदिरा गांधींवर 'प्रियदर्शिनी' हा कवितासंग्रह देखील प्रसिद्ध आहे. त्यांचे, तूही यत्ता कंची (१९८१), मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला, गांडु बगीचा, आणि इत्तर कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना सोव्हिएत लेंड नेहरू पुरस्कार, राज्य शासनाचा केशवसुत पुरस्कार, पद्मश्री, साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

क्रीडा मंडळ ऐक्य समतीच्या काळात अडचणीच्या वेळी दादा,अर्जुन डांगळे, व भाई संगारे नेहमी आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला प्रोत्साहित करायचे. ज्या वेळी वाल्मिकी समाजातील काही लोकानी विनाकारण वाद करून दंगल घडवुन आणली व त्यात एक हत्या झाली, तेव्हा पहिल्यांदा तशा तणावाच्या परिस्थितीत देखील वाल्मीक मंदिरात जाऊन त्यांच्या प्रमुख लोकांशी बोलण्याचे धाडस दादांनी केले होते. मधुकर तेलोरे व गोरख भिसे ह्यांना मिसाखली अटक करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ व त्यांची सुटका करावी या मागणी साठी मी व दिनकर देठेनी विधानसभेवर मोर्चा आयोजित केला होता. तेव्हा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात आमच्या सह एड. निलोफर भगवत व दादा देखील होते. मी वर्तमानपत्रात दादा बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याची बातमी वाचली.

मी बडोद्याला जाण्याच्या तयारीत होतो. मी दादांना फोन लावला. क्षेम कुशल विचारले. दादा म्हणाले की, बऱ्याच दिवसात भेटला नाहीस, एकदा येऊन भेट. मी म्हटले, नक्की येईन. त्याच्या दोन तीन दिवसानंतर त्यांच्या निधनाची बातमी आली. माझ्या दुर्दैवाने मला अंत्ययात्रेला जाता आले नाही, ही सल मला तहहयात बोचत राहणार आहे.

ह्या सर्व चळवळीचे मुख्य केंद्र होते, ते म्हणजे माटुंगा लेबर कॅम्प मधील बाबुराव बागुल ह्यांचे घर. ते नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे, दया पवार, ह्या सगळ्यांचे गुरु. त्या काळात हे सर्व लोक सतत लेबर कॅम्प मध्ये येत असत. ज्यांनी प्रस्थापित साहित्य झुगारून दलीत साहित्य हा तळागाळातील जीवनशैली अधोरेखित करणारा व प्रस्थापित साहित्यिकांच्या कल्पणेबाहेरचा साहित्य प्रकार साहित्यात आणला, आणि जगाला जातीप्रथेमुळे विस्थापित झालेल्या समाजाची ओळख साहित्यातून करून देण्याची सुरुवात केली. एवढी मोठी कामगिरी करून देखील त्यांचे साहित्यिक वारसदार किंवा वंशिक वारसदार, त्यांची स्मृती कोणत्याही प्रकारे जतन करून ठेवण्यात अपयाशी ठरले आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. दादांचे १५/०१/२०१४ रोजी बॉम्बे हॉस्पिटल येथे मायस्थेनिया ग्रेविस ह्या आजाराने निधन झाले. त्यांचे कायमस्वरूपी स्मारक उभे राहावे. यासाठी मी त्यांच्या सुह्रदयाणा, अनुयायांना, समाजाला कळकळीची विनंती करतो. आज दादांच्या स्मृतिदिनी त्यांना पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करून हा लेखन प्रपंच संपवतो.

आपला
अरुण निकम
9323249487
8459504317

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools