*"१५ फेब्रुवारी २०२४ : पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती निमित्त"*
*- सुरेश केदारे*
*केंद्रिय अध्यक्ष*
*दलित पँथर (एन एल डी)*
वर्गविहिन आणि जातिविहीन समाजरचना निर्माण करून सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करणे हे आंबेडकरी मुक्ती लढ्याचे अंतिम उद्दिष्ट होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सुद्धा ते अपूर्णच राहिले. आंबेडकरोत्तर कालखंडात सत्तरीच्या दशकात दलितांवरील अन्याय अत्याचार आणि तत्कालीन रिपब्लिकन पक्षाच्या नाकारतेपणाविरुद्धचा विस्फोट दलित पँथरच्या उद्रेकातून झाला. त्या उद्रेकाचे प्रमुखच नव्हे तर दलितांच्या तिसऱ्या पिढीच्या चळवळीचे कृतिशील जनक म्हणून नामदेव ढसाळ यांचे नाव अधोरेखित झाले आहे.
आजचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वास्तव पाहता पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी पँथर काळात जातवास्तव स्वीकारूनही वर्गीय जाणिवांवर आधारलेले शोषित पीडितांचे सर्वंकष मुक्तीचे आर्थिक लढे आणि सांस्कृतिक मूल्य बदलाच्या लढाईची मूलगामी भूमिका ही किती अपरिहार्य आणि आवश्यक होती हे आज काळाने सिद्ध केले आहे. मला दिलेल्या "तुझे बोट धरून चाललो आहे मी" या कवितासंग्रहाच्या अभिप्रायात नामदेव दादा म्हणतात; "सांस्कृतिक मूल्याच्या लढाईचे ज्याना महत्व वाटत नाही ते राजकीय / सामाजिक / आर्थिक न्यायाची लढाई जिंकले तरी ते एकार्थी पराभूतचं होत. ही पराभूतता वाट्यास येऊ नये म्हणून जो संघर्ष - ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे या सर्वांचे ज्याना भान नाही ते शतमूर्ख होत. अशा शतमूर्खांचा सहवास माझ्या सारख्यांना काट्यासारखा टोचणारा आहे."
आपल्या समग्र जीवनात त्यांनी अनेक विषयांवर वैचारिक लेखन केले. "आंबेडकरी चळवळ, सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट" हे पुस्तक, "आंधळे शतक" व "सर्व काही समष्टीसाठी" हे गाजलेले लेखसंग्रह तसेच "गोलपिठा" ते "निर्वाणा अगोदरची पिडा" असे तब्बल पंधरा कवितासंग्रह शिवाय इतर स्फुटलेखन हे कार्यकर्त्यांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरले आहेत. आपल्या प्रभावी भाषणात ते नेहमी म्हणायचे; "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची समिक्षा केली ती कालसुसंगत आणि अपरिहार्य होती. आता निव्वळ प्रबोधनाची गरज नाही, याउलट यासर्व जाती पोटजातींची निर्णायक एकजूट करून व्यवस्थेविरुद्धचा एल्गार पुकारण्याची गरज आहे.
*"तुझे आहे तुझ पाशी*
*परी जागा विसरलाशी"*
या संत तुकारामांच्या वचनाचा हवाला देत असतानाच, *"ज्याचा स्वाध्याय बुडाला त्याचे जग बुडाले.."* असे ते आवर्जून सांगायचे. त्यांचा मिळालेला सततचा सहवास आणि वैचारिक मार्गदर्शन हे मला फारच अमूल्य आहे.
२०१४ नंतर भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिपेक्ष पूर्णतः बदलून गेले आहे. नवउदारवादाच्या अर्थनितीने दलित शोषित घटकांचे प्रश्न परिघावर गेले आहेत. गावगाड्यातला दादांच्या जिव्हाळ्याचा कारू - नारू उद्ध्वस्त झाला आहे. प्रस्थापितांशी मांडलीकत्व पत्करण्याच्या मानसिकतेमुळे चळवळीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा संक्रमण काळात नामदेव दादांची खूप आठवण येते. सर्व काही समष्टीसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या या झुंजार नेत्याच्या मार्गदर्शनाची या काळात चळवळीला गरज होती.
दलित संघर्षावर आधारित एक कादंबरी लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्या कादंबरीचे नावही त्यांनी मला सांगितले होतें.
दलित संघर्षावर आधारित एक कादंबरी; *"उजेडाची काळी दुनिया"* ही त्यांना लिहायची होती. पण ते लिहिणे राहूनच गेले.
*माझ्या या लाडक्या नेत्याला ७५ व्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी जय भीम आणि विनम्र अभिवादन.*
संपर्क: 8879997248.
0 Comments