दर्यापूर/दै.मू.वृत्तसेवा
अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघातील खल्लार या गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत मोठा गोंधळ झाला आहे. दोन गटात झालेल्या गोंधळातील काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सभेत झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत काही कार्यकर्त्यांनी थेट नवणीत राणांच्या दिशेने खुर्च्या फेकल्याचं दिसत आहे.
शनिवारी रात्री नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघात प्रचारासाठी आल्या होत्या. खल्लार या गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी नवनीन राणा यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. यावेळी दोन गटाचे कार्यकर्ते भिडले. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले. पण यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समजतेय. खुर्च्या फेकून मारल्या. तोडफोड करण्यात आली. दोन गटात जोरदार घोषणाबाजी आणि मारमारी झाल्याचं समोर आलेय.
नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचे समोर आलेय. या प्रकारानंतर नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने दर्यापूर येथील राजकीय वातावरणात तणाव वाढला आहे. सध्या खल्लार गावात शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
नवनीत राणा यांच्याकडून खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल जंजाळ यांनी दिली आहे. पोलिसांनी 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मला पाहून त्या लोकांनी शिवीगाळ केली. माझ्या पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण झाली. मला त्यांनी मारलं माझ्या अंगावर त्यांनी खुर्च्या फेकल्या. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
0 Comments