छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी त्या-त्या मतदारसंघात होणार आहे.
मतदारसंघात मतमोजणीसाठी सर्व मिळून २०८ टेबल असतील. यातील १२६ टेबलवर ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल. तर टपाली मतपत्रिकांसाठी ७० टेबल आणि ईटीपीबीएससाठी १२ टेबल असतील. साधारणतः २० मिनिटांत मतमोजणीची एक फेरी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरून आलेल्या ईव्हीएम आणि इतर साहित्य स्ट्रांग रूममध्ये सील करण्यात आले आहे. शनिवारी मतमोजणीवेळी या ईव्हीएम तसेच टपाली मतपत्रिका बाहेर काढण्यात येतील. सर्व मतदारसंघात त्या-त्या ठिकाणी मतमोजणीची सोय केली आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतपत्रिकांपासून होईल. त्यानंतर पहिल्या पंधरा ते वीस मिनिटांनंतर लगेचच ईव्हीएममधील मतांची मोजणीही सुरू होईल. एकाचवेळी दोन्ही ठिकाणी मोजणीचे काम चालेल. मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आजच सरमिसळ करण्यात आली आहे.
मोजणीसाठी सर्व मतदारसंघात मिळून ईव्हीएमसाठी १२६ टेबल असतील, टपाली मतपत्रिकांसाठी ७० टेबल असतील तर ईटीपीबीएससाठी १२ टेबल असतील. ८५२ मतमोजणी कर्मचारी, २४२ सूक्ष्म निरीक्षक व ३००० पोलिस कर्मचारी असे ५७७८ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची उपस्थिती होती.
मतदारसंघ निहाय फेऱ्या
औरंगाबाद मध्य - 23, औरंगाबाद पश्चिम 28, औरंगाबाद पूर्व 24, पैठण 26, गंगापूर 27, वैजापूर 26, सिल्लोड 26, कन्नड 27, फुलंब्री 27 इत्यादी.
- किरण आरके
0 Comments