छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने दोन कार्यकर्त्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. एकावर कन्नड येथे तर दुसऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पिच्चर बहोत सारा बाकी है, कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे ही घटना घडली. सुनील रामदास शिरसाठ आणि आनंद वसंत जाधव असे विष प्राशन केलेल्या दोघा कार्यकर्त्यांची नावे आहेत. या दोघांना उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकावर कन्नड येथे उपचार सुरू असून दुसऱ्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दादा पडायला नाही पाहिजे होता, आता आम्ही काय करु म्हणत त्यांनी हा जीवघेणा मार्ग पत्करल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.
मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो, कृपया कुणीही असे कोणतेही पाऊल उचलू नका. कारण अभी पिच्चर बहोत सारा बाकी आहे. सगळे संपले आहे, असे समजू नका. अजून सुरुवात देखील झालेली नाही. मला स्वत:ला विकावे लागले तरी विकेन, पण तुमच्या आशा आकांक्षांना वाया जाऊ देणार असा शब्द देतो. आत्महत्येचा प्रयत्न, विष पिणे असे प्रकार करू नका. मतदारसंघात आपणच राजे आहोत. मला विकावे लागले तरी चालेल पण तुम्हाला ईजा होऊ देणार नाही, असे म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून तरुणांना विनंती केली आहे.
- किरण आरके
0 Comments