छत्रपती संभाजीनगर : शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा भोसकून खून करण्यात आला. हा हल्ला टोळक्याने हॉटेल मालक समजून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. मृत तरुणाचे नाव संतोष राजू पेड्डी (२८, रा. राजज्योती बिल्डिंग, उस्मानपुरा) असे आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष पेड्डी एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांचे काम रात्री उशिरापर्यंत वर्क फ्रॉम होमच्या स्वरूपात चालायचे. पेड्डी कुटुंबीयांचा रोपळेकर हॉस्पिटल परिसरात डेअरी व्यवसाय आहे. घटनेच्या वेळी संतोष यांचे कुटुंबीय लग्नानिमित्त हैदराबादला गेले होते, त्यामुळे संतोष घरी एकटे होते. पहाटे काम आटोपल्यावर त्यांना भूक लागली, म्हणून त्यांनी जवळ राहणारे गाडीचालक राधेश्याम अशोक गडदे (मूळ रा. मंठा) यांना फोन करून बोलावले.
दोघेही फॉर्च्यूनर कारने (एमएच १२ एफवाय ४१९४) बीड बायपासमार्गे झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये गेले. हॉटेलसमोर कार लावून आत जाण्याच्या तयारीत असताना समोरून आलेल्या टोळक्याने हॉटेल मालक समजून संतोष यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान, टोळक्यातील एका व्यक्तीने संतोष यांच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकूने वार केला. हल्ला इतका जोरदार होता की, चाकू थेट हृदयापर्यंत घुसल्याने संतोष जागीच कोसळले.
चालक राधेश्याम गडदे यांनी संतोष यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, घाटी रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून संतोष यांना मृत घोषित केले.
संतोष यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
0 Comments