छत्रपती संभाजीनगर : हर्सूल गावातील शिवाजी मैदानावर तिघांनी जुन्या भांडणाचा वचपा काढताना २२ वर्षीय तरुणावर कटरने सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (५ डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
अमीत माणिक आदमाने (वय २२, रा. जहाँगीर कॉलनी, हर्सल) असे गंभीर जखमीचे नाव आहे. जम्या उर्फ जमील बब्बू कुरेशी, साहेल बाबा कुरेशी (दोघे रा. जहाँगीर कॉलनी, हर्सूल) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. अमीत आणि त्याचा मित्र सलमान सय्यद हे जहाँगीर कॉलनीतून हर्सूल गावातील शिवाजी मैदानावर आले. तिथे ओळखीचे असलेले जमील व सोहेलने मागील भांडणाच्या कारणावरून अमीतला शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे दोघांत वाद होऊन दोघांनी अमीतला मारहाण सुरू केली. सोहेलने हातातील कटरने अमीतच्या छातीवर सपासप वार केले. त्यामुळे अमीत गंभीर जखमी झाला. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमीतच्या जबाबावरून हर्सूल पोलिसांनी जमील व सोहेलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे करत आहेत.
0 Comments