मुंबई : वसई विरार मध्ये ईडीने परत एकदा कारवाही सुरू केली आहे. विरारमधील वास्तुविषारद (आर्किटेक्ट) आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत. हे छापे मुंबई आणि वसई विरार मध्ये विविध ठिकाणी टाकण्यात आले आहेत.
नालासोपारा पूर्व परिसरातील अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर (ईडी) या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती.
या संपूर्ण प्रकरणात माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि महापालिकेचे अधिकारी आणि नगररनचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करीत होती.
ईडीच्या पथकाने १४ मे रोजी वसई, विरार शहरासह १३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते आणि चौकशी सुरू केली होती. ह्या मध्ये वसई, विरार महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. या कारवाई मध्ये रेड्डी यांच्या घरातून सुमारे ८ कोटी ६ लाख रुपये रोख रक्कम आणि २३ कोटी २५ लाख रुपयांचे हिरे जडित दागिने आणि सोने जप्त करण्यात आले. तसेच यावेळी रेड्डी यांच्या घरातून ३२ कोटी रुपयांचे सोने आणि रोकड जप्त केली होती.
सोमवारी ईडीने या प्रकरणाशी संबंधित वास्तुविषारद आणि नगररचना (टाऊन प्लानिंग) विभागातील अभियंत्याच्या घरी छापे टाकले. वसई आणि मुंबईतील १२ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
वसई विरार प्रतिनिधि - सनील माहीमकर
0 Comments