पुणे: मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एका माजी विद्यार्थ्याला नोकरीसाठी आवश्यक असलेले 'शैक्षणिक संदर्भ पत्र' (Education Reference Letter) देण्यास कॉलेजने नकार दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉलेज प्रशासनावर आणि प्राचार्यांवर 'जाती-आधारित भेदभाव' करून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान (Academic Sabotage) केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
प्रेम बिरहाडे नावाच्या या विद्यार्थ्याला लंडन येथील हिथ्रो विमानतळावर प्रतिष्ठित नोकरी मिळाली होती, पण कॉलेजने 'शैक्षणिक संदर्भ पत्र' (एम्प्लॉयमेंट रेफरन्स) देण्यास नकार दिल्याने त्याला ती नोकरी गमवावी लागल्याचे वृत्त आहे.
प्राचार्यांचे सोशल मीडियावर स्पष्टीकरण
मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पत्र पोस्ट करून या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रेम बिरहाडे या विद्यार्थ्याला त्याच्या "विद्यार्थी म्हणून असलेल्या कार्यकाळात असमाधानकारक वर्तन आणि शिस्तभंगाच्या नोंदीमुळे" नोकरीसाठीचे 'शैक्षणिक संदर्भ पत्र' देण्यात आले नाही.
प्राचार्यांच्या स्पष्टीकरणातील विसंगतीवर प्रश्नचिन्ह -
प्राचार्यांच्या याच पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, प्रेम बिरहाडे याला याच कॉलेजने यापूर्वी यूकेमधील प्रवेश प्रक्रियेसाठी वापरण्यासाठी तीन शिफारसपत्रे आणि एक बोनाफाईड सर्टिफिकेट (Bonafide Certificate) दिली होती.
प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप -
प्राचार्यांच्या या विसंगत भूमिकेवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर प्रेम बिरहाडे याचे वर्तन खरोखरच कॉलेजमध्ये असताना 'असमाधानकारक' होते, तर त्याच कॉलेजने त्याला एक नाही, दोन नाही, तर तीन शिफारसपत्रे आणि बोनाफाईड सर्टिफिकेट का दिले? यांचा वापर त्याने यूकेमधील एका विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी केला. मग, अचानक असे काय बदलले?
त्यावेळी तो शिफारसपत्रासाठी योग्य होता, पण आता परदेशात जागा निश्चित झाल्यानंतर कॉलेजला अचानक त्याचे चारित्र्य समस्याग्रस्त का वाटू लागले आहे?
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, सत्य हे आहे की, हा विषय शिस्तीचा नाहीये. हा विषय आहे अस्वस्थतेचा. एका दलित विद्यार्थ्याने समाजाकडून त्याच्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचे धाडस केल्यामुळे होणाऱ्या अस्वस्थतेचा!
कॉलेजने जे केले आहे, ते केवळ अनैतिक नाही, तर ते जाणीवपूर्वक केलेले आणि भेदभावपूर्ण कृत्य आहे! हा जातिभेदावर आधारित शैक्षणिक खोडसाळपणा आहे!
या गोष्टीला आपण तिच्या योग्य नावाने हाक मारायला हवी: जाती-आधारित भेदभाव (caste-based discrimination). आणि हे केवळ चुकीचेच नाही, तर गुन्हा आहे!"
प्रेम बिरहाडे याने नंदुरबारसारख्या आदिवासी भागातून येऊन यूकेमध्ये शिक्षण घेतले आणि लंडनमध्ये नोकरी मिळवण्यापर्यंत मजल मारली. मात्र, केवळ 'जाती-आधारित भेदभावा'मुळे त्याला नोकरी गमवावी लागली, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
सौजन्य: प्रबुद्ध भारत
0 Comments