जालना : घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथे शबरी घरकुल योजने अंतर्गत बांधण्यात आलेली भिल्ल समाजातील घरे सामाजिक व राजकीय द्वेषातून पाडल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आणि पाडलेली घरे पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे.
घरे पाडण्यास ग्रामसेवक, सरपंच आणि गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत, डोके यांनी त्यांच्यामार्फत झालेल्या या कृतीची योग्य ती चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी एकलव्य संघटना आणि भिल्ल समाज बांधवांसह निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
यावेळी डोके यांनी जिल्हाधिकारी अमीशा मित्तल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, जर या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून दोषींवर कारवाई झाली नाही आणि पाडलेली घरे पुर्ववत करण्यात आली नाहीत, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी दिला आहे.
यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळु बर्डे, वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी तालुकाध्यक्ष समाधान तोडके, तालुका महासचिव बाबासाहेब गालफाडे, तालुका संघटक बाबासाहेब सोनोवने, संतोष मगर यांच्यासह भिल्ल समाज बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: प्रबुद्ध भारत
0 Comments