नवी दिल्ली - आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. संपूर्ण जग भीषण पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. बहुतांश देशात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यामुळे सगळ्या जगाला हवामान बदलाचे परिणाम भोगावे लागत आहेत. यामध्ये येणाऱ्या काळात आणखीन वाढ होण्याचा धोका आहे. दरम्यान भारतामध्ये 2050 सालापर्यंत लहान मुलांची संख्या 35 कोटी होणार असून, त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे, असा इशारा युनिसेफच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे.
युनिसेफने जागतिक पातळीवरील मुलांच्या संख्येबाबत यंदाच्या वर्षीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, लोकसंख्येत होणारे बदल, पर्यावरणामुळे उभी ठाकणारी संकटे, बदलते तंत्रज्ञान यामुळे 2050 सालापर्यंत या मुलांच्या जीवनमानातही बदल होतील. विद्यमान आकडेवारीच्या तुलनेत भारतात मुलांच्या संख्येत 10 कोटींहून अधिक संख्येने घट होणार आहे. सध्या भारतामध्ये 44 कोटींहून अधिक लहान मुले आहेत.
दी एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सुरुची भडवाल, युनिसेफचे कार्तिक वर्मा, युनिसेफच्या भारताच्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी हा अहवाल सर्वांसाठी खुला केला. त्यात म्हटले आहे की 2050 पर्यंत लहान मुलांना हवामान बदल तसेच पर्यावरणीय धोक्यांचा सामना करावा लागेल. 2000 सालाच्या तुलनेत आठ पट जास्त मुलांना उष्णतेच्या तीव्र लाटेला सामोरे जावे लागणार आहे.
कमी उत्पन्न असलेल्या देशांत विशेषतः आफ्रिकेत या आव्हानांचा सामना करण्यासाठी अपुरी संसाधने असण्याची शक्यता आहे. आफ्रिकेतील देशांत दारिर्द्य, कमी शिक्षण, आरोग्याची हेळसांड अशा अनेक समस्या आहेत. त्यातील काही देशांत सतत युद्धग्रस्त वातावरण असते. त्यामुळे त्या देशांतील लहान मुलांची स्थिती अधिक हालाखीची आहे.
हवामान बदलाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामांचा लहान मुलांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 95 टक्क्यांहून तर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण फक्त 26 टक्के आहे. हवामान, पर्यावरणाच्या धोक्यांची आगाऊ सूचना मिळण्याच्या व त्यादृष्टीने दक्षतेचे उपाय घेण्याकामी आधुनिक तंत्रज्ञान खूप उपयोगी ठरते. कमी उत्पन्न असलेल्या देशांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे आवाहन सुरुची भडवाल यांनी केले आहे.
जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि त्यातून उदभवणाऱ्या पर्यावरणविषयक समस्या आता काही नवीन नाहीत. काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे वाटणारे हे विषय आता आपल्या घराचे दारही ठोठावत आहे. महापूर, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेची लाट, वणवे, इथपासून धुळीचे वादळाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यावर भरपूर चर्चा केली जाते.
उपाययोजना शोधल्या जातात. मात्र, निसर्गचक्रातील बदलाचा मोठा परिणाम लहान मुलांवरही होतोय. पण हा वर्ग कायम दुर्लक्षित राहतो. अशातच आता हवामान बदलाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामांचा लहान मुलांना तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

0 Comments