नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
दिवाळीच्या सणादरम्यान कंपन्या, कार्यालये आणि कारखान्यांमध्ये कार्यरत कामगारांना बोनस देण्यात आला तर काही ठिकाणी कमी बोनस देण्यात आला. असाच काही प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर घडला. दिवाळी बोनस कमी मिळाला म्हणून संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी टोलचे गेट उघडले. त्यामुळे हजारो गाड्या टोल न भरताच निघून गेल्या. त्यामुळे टोल कंपनीला लाखो रुपयांचे नुकसान झाले. टोल प्लाझावर 21 कर्मचारी आहेत. दिवाळीसाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना फक्त 1,100 रुपयांचा बोनस दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टोल नाक्याचे गेट उघडून आपला संताप व्यक्त केलाय.
कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला दिवाळी बोनस मागितला. पण मॅनेजरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. संतापलेल्या कर्मचऱ्याने टोलचे गेट उघडेच ठेवले. त्यामुळे हजारो वाहने टोल न भरताच गेली. याचा त्या कंपनीच्या मालकाला 30 लाख रूपयांपर्यंतचा फटका बसला आहे. सुरुवातीला व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहोचले पण त्यांना काहीही करता आले नाही.
दुसरीकडे हरियाणातील गनौर येथे अशीच एक घटना घडली आहे, जिथे एका कारखान्याने आपल्या कामगारांना दिवाळी बोनसऐवजी सोनपापडीचे डबे दिले. या निर्णयाने नाराज झालेल्या कामगारांनी सोनपापडीचे डबे कारखान्याच्या गेटसमोरच फेकून दिले.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात कंपनीतील कामगार कारखान्याच्या गेटबाहेर तेच गिफ्ट बॉक्स फेकताना स्पष्ट दिसत आहेत. ही घटना एका मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील असल्याचे सांगितले जात आहे. कारखान्याचे नाव किंवा स्थान यांची अद्यापर्यंत अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या सोनपापडीच्या भेटवस्तूंमुळे कामगार नाराज आहेत आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणाचा अपमान म्हणून पाहतात. कर्मचारी याला प्रतिष्ठेचा अपमान म्हणत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच, औद्योगिक क्षेत्रात आणि सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय बनला. कामगारांच्या संतापाचे अनेक जण समर्थन करत आहेत, तर काही जण याला अतिरेक प्रतिक्रिया म्हणत आहेत.

0 Comments