सोलापूर : (महूद) बदलत्या परिस्थितीनुसार समाजापुढील प्रश्नही बदलत आहेत. सामाजिक सुधारणांवर सर्वजणच बोलतात, मात्र कठीण वेळ आल्यानंतर जुन्या रूढी व परंपराखाली अनेकजण दबले जातात.
मात्र महूद (ता सांगोला) जि सोलापूर येथील खबाले कुटुंबियाने स्वतःच्या विधवा सुनेचे कन्यादान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
हे म्हणजे देवळाली प्रवरा पॅटर्न समाजमान्य झालेचा आम्हाला आनंद झाला असल्याचे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा शहरातील आप्पासाहेब ढुस यांचा पुतण्या किशोर राजेंद्र ढुस यांनी नऊ महिन्याचे बाळ असलेल्या कोरोना एकल (विधवा) महिलेशी लग्न करून तिचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करून राज्यात सर्वप्रथम आदर्श घालून दिला.
या घटनेची राज्य महिला आयोग आणि महिला बाल कल्याण मंत्रालयाने दखल घेतली होती, त्यामुळे माहुद येथील विवाह म्हणजे देवळाली प्रवरा पॅटर्न समाजमान्य झालेचे धोतक असल्याचे ढुस यांनी सांगून या नव दाम्पत्याचे अभिनंदन केले.
सांगोला तालुक्यातील महूद येथील तानाजी धोंडीराम खबाले व पत्नी कमल खबाले हे दोघेही प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत आहेत.
यांना जयंत व माधव ही दोन हुशार, देखणी अन् रुबाबदार मुले तानाजी व कमल खबाले या शिक्षक दांपत्याने शिक्षणसेवा प्रामाणिकपणे पार पाडत असतानाच स्वत:च्या मुलांनाही स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले.
थोरला मुलगा जयंत याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पण त्याचे स्वप्न उद्योजक होण्याचे होते. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून चांगल्या पॅकेजेसच्या ऑफर असूनही त्याने ज्वेलर्स उद्योगाचे ज्ञान घेतले आणि महूद येथे ज्वेलर्सचा व्यवसाय सुरू केला.
स्वतःच्या नम्र, विनयशील स्वभावाने व्यवसायाला बरकत आणली. धाकटा मुलगा माधव वैद्यकीय शिक्षण घेत होता. संसाराच्या वेलीवर उमललेली दोन्ही फुले टवटवीतपणे बहरत होती. थोरला मुलगा जयंत योग्य वयात असल्याने आणि उद्योगातही स्थिरावल्याने त्याचा विवाह पंढरपूर येथे दीप्ती नवनाथ पवार हिच्याशी 7 एप्रिल 2019 झाला.
नवविवाहितांचा संसार माता-पित्याच्या सहवासात गुण्यागोविंदाने चालू होता. जयंत हा मित्राच्या हळदी समारंभास उपस्थित राहून परतत असतानाच 24 ऑगस्ट 2020 रोजी अंधारात अचानक आडवे आलेले कुत्रे न दिसल्याने भीषण अपघात होऊन, जलद वैद्यकीय उपचारानंतरही तो या हसत्या खेळत्या आनंदी जगातून अगदी लहान कोवळ्या वयात निघून गेला तो कायमचाच.
केवळ दीड वर्षातच खबाले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पुत्रवियोगाचे दु:ख सहन करीत तानाजी व कमल खबाले यांनी पोटच्या मुलीप्रमाणे जीव लावलेल्या दीप्ती या सुनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी एखादा चांगला, सुधारणावादी विचाराचा, कर्तृत्ववान, विवाहेच्छुक मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली.
आणि दुसरीकडे पती विरहाचे दु:ख सोसणाऱ्या सुनेचेही समुपदेशन करण्यास सुरुवात केली.
परंपरा, जुनाट रुढींची बंधने याचा विचार न करता, मराठा समाजातील सुधारणावादी विचारांचा पुरस्कार करीत या दांपत्याने अगदी सुनेला स्वतःची मुलगी मानून धाडसाने तिचा दुसरा विवाह लावून देण्यासाठी कन्यादानाचा निर्णय घेतला.
महर्षी कर्वे, महात्मा फुले यांनी 18 व्या शतकात विधवा विवाहाविषयी सामाजिक जागृती केली होता.
समाजसुधारकांनी दाखवून दिलेल्या सुधारणावादी मार्गावर चालण्याचे साहस करून खबाले शिक्षक दांपत्याने दीप्ती हिचा पुनर्विवाह करून देत स्वखर्चातून तिचे कन्यादान ही नुकतेच केले आहे.
सुनेच्या जीवनातील अंधार तर दूर केलाच पण बहुजन समाजातील तरुणांपुढे सामाजिक सुधारणा नुसत्या बोलायच्या नसतात तर कितीही संकटे आली तर त्या स्वतःच्या कृतीतून अंगिकारायच्या असतात.
तरच त्या पूर्णत्वाला जातात आणि भविष्यात असे कटू प्रसंग निर्माण झाल्यास भविष्यात असे कटू प्रसंग आल्यास कोणता निर्णय घ्यावा याचा चांगला आदर्श खबाले शिक्षक दांपत्याने घालून दिला आहे.
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पत्नीचे निधन झाले तर पुरुष लगेच दुसरे लग्न करतो. मात्र पतीच्या निधनानंतर पत्नी वरती अनेक प्रकारचे निर्बंध घातले जातात.
याचे कारण म्हणजे आपली समाज व्यवस्था ही पुरुषसत्ताक पद्धतीची आहे.
धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा याच्या नावाखाली महिलांवर अन्याय केला जातो, त्यांचे दमन केले जाते. खबाले कुटुंबाने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी व दिशादर्शक आहे.
दबलेल्या महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा व महिलांचा आदर करणारा आहे; समाजाने या घटनेतून प्रेरणा घेऊन अनिष्ट रूढी, परंपरा मधून बाहेर पडावे आणि मुला प्रमाणेच मुलींच्याही भावनांचा आदर करावा..
0 Comments