जव्हार - मोखाडा आदिवासी समाजातील वातास कुळ परिवाराचा मेळावा मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी (तूळ्याचापाडा) येथे परिवाराचे कुलदैवत हिरवा देव व नारायण देव यांची पूजा करून मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्या दरम्यान गावात सांबळ वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून कुलदैवत यांचे पूजन करण्यात आले.
वातास परिवारातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड अशा विविध तालुक्यातील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रावण वातास यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक सादर करताना परिवाराची माहिती व मूळ गाव कोणते तसेच ग्रामीण भागात वातास परिवार कसे स्थायिक झाले याविषयी माहिती दिली .
श्री नहारे महाराज यांनी मानवी शरीर व कुळ या विषयी मार्गदर्शन केले तसेच प्रा.नामदेव मासी यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देऊन आधुनिक काळानुसार कसा बदल व्हायला हवा हे आवर्जून सांगितले.
दैवी शक्ती व समाजात महिला सक्षमीकरण होणे भविष्याची गरज असल्याचे मत श्रावण वातास यांनी मांडले तसेच वातास कुळ परिवाराचे सचिव मुकेश वातास यांनी परिवाराने एकत्रित येऊन एकमेकांना येणाऱ्या अडचणींची देवाण-घेवाण करणे, न आलेल्या वातास बांधवांना समाविष्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या दरम्यान विविध तालुक्यातून आलेल्या कुळ परिवारांनी आपली स्वतःची ओळख देऊन आगामी होणाऱ्या कुळ परिवाराचा मेळावा हा वाडा तालुक्यातील वडवली या गावी घेण्याचे निश्चित करून शेवटी अर्जुन वातास यांनी आलेल्या सर्व वातास परिवारांचे आभार मानून मेळाव्याचा समारोप करण्यात आला.
0 Comments