जव्हार :पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि ग्रामीण भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील वडोली येथील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने मद्यपान करून एका व्यक्तीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे संभाषण समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे.
याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी दिल्या आहेत.
जव्हार तालुक्यात गेली जवळपास १९ वर्षे कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने त्यांची पत्नी सेवेत असलेल्या आश्रमशाळेशी संलग्न एका व्यक्तीला मद्यपान करून शिवीगाळ केली.
विशेष म्हणजे या शिक्षकाविरुद्ध मागील काही वर्षांत १५ पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. परंतु राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.
तसेच त्याच्याविरुद्ध शिक्षण विभाग कारवाई करण्याचे धाडस दाखवत नव्हते, मात्र शिवीगाळ करणे तसेच संस्थाचालकांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या या शिक्षकाविरुद्ध जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.
त्यामुळे संबंधित शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पालवे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
0 Comments