जव्हार - जव्हार तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहे.
याच सुट्टीमध्ये महिलावर्ग वर्षभरासाठी लागणारा मसाला, पापड, कुरडई आणि लोणचे अशा कामाला लागत असतात.
या भागात लाल मिरचीचे उत्पन्न अगदी अल्प प्रमाणात होत असल्याने, केवळ आयात केलेली मिरची पासून घरगुती वापरासाठी मसाला केला जात असतो. यंदा लाल मिरचीचे उत्पन्न कमी झाल्याने किंमत भडकली आहे,त्यामुळे लाल मिरचीचा चांगलाच ठसका बसत आहे.
सध्या सर्वत्र महागाई वाढत असतानाच आता लाल मिरचीही मागे नाही. मागील काही दिवसांमध्ये बाजारात आवक कमी झाल्याने लाल मिरचीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना लाल मिरची भाववाढीमुळे आणखी तिखट झाली आहे.
विशेष म्हणजे या भागात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने सर्वच वस्तू या अधिक लागत असतात, अश्या परिस्थितीत महिला वर्गाला आर्थिक गणित सांभाळून कुटुंबासाठी मसाला करण्याचे आर्थिक गणित अतिशय कौशल्य पूर्वक सोडवावे लागणार आहे.
बहुतांश घरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मसाला व इतर पदार्थ बनविले जातात. त्यामुळे या दिवसांमध्ये मिरचीची मागणी वाढते ,यावर्षीही मागणी वाढली आहे.
मात्र उत्पादन घटल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाववाढ होत आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस तसेच विविध रोगांमुळे उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे.
जव्हारच्या बाजारात उपलब्ध असलेली मिरची व भाव
लवंगी. ३०० प्रति किलो
तेजा. ३०० प्रति किलो
काश्मिरी. ७०० प्रति किलो
घांटुर. ३२० प्रति किलो
बेडकी १ . ६०० प्रति किलो
बेडकी २. ५०० प्रति किलो
चपटा. ५०० प्रति किलो
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिरचीची मागणी वाढते. दरम्यान, यावर्षी उत्पादनात घट झाली आहे.
त्यामुळेच मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. पावसाळ्यास काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रशांत वनमाळी, मिरची विक्रेता .
यंदा मिरचीची किंमत अधिक वाढल्याने घरात मसाला बनविताना काही वस्तू वापरताना काटकसर करावी लागणार आहे.
मसाला चांगला होण्यासाठी यंदा तडजोड करावी लागत आहे. कमल साळवे - गृहिणी
0 Comments