कोल्हापूर/दै.मू.वृत्तसेवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 1500 रूपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत अथवा सभेत दिसल्या् तर त्यांचे फोटो काढा व नावे लिहुन घ्या आणि आमच्याकडे पाठवा. त्यांची व्यवस्था करू, अशी धमकी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी एका प्रचारसभेत दिली. महायुतीच्या उमेदवाराच्याभ प्रचारार्थ फुलेवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. कोण लय बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा इशाराही धनंजय महाडिक यांनी दिलाय. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे.
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करताना म्हणाले कि या राज्यात विरोधकांच्या सुनेला देखील साडीचोळी देऊन पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला आहे. या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. धनंजय महाडिक यांनी गेल्या वेळेस देखील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा महिलांचा बंदोबस्त करू व्यवस्था करू, असे म्हणत अपमान करत आहेत. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूरकरांना माहिती आहे. गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा महाडिक कंपनीचा राहिला आहे. मात्र, कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे असल्या धमकीला कोल्हापूरची माता-भगिनी घाबरणार नाही.
ते 1500 रूपये घरातले पैसे दिल्यासारखे बोलत आहेत. 1500 रुपये दिले आहेत आमच्या सोबत या, छाती बडवून घेत म्हणत आहे. आमची सुरक्षा द्या म्हणत आहेत. त्यांना महिलांना कोणतीही सुरक्षा देण्याचं मनामध्ये नाही. मुळात महाडिक हे कोल्हापूरचे नाही, कोल्हापूरशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते पर जिल्ह्यातले आहेत. या मातीचा गुण काय आहे त्यांना माहिती नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी आणि काँग्रेस जाहीर निषेध करतो, असे सतेज पाटील म्हणाले आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हा व्हिडिओ ‘एक्स’वरून शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश! काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त 1500 रुपये? लाडक्या बहिणीबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली! सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, आमच्या आया बहिणीना भाजप पासूनच धोका आहे, अशी टीका केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझीलाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. महायुतीने महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. तर आताच्या जाहीरनाम्यात महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांचं सरकार आलं तर दर महिन्याला 3000 रुपये देण्यार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलं आहे. या योजनाना घेऊन महायुतीतील प्रत्येक उमेदवार आणि नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अशातच भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महिलांना जाहीर सभेत स्टेजवरुन धमकी दिली आहे. मात्र धनंजय महाडिक यांनी विरोध होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.
0 Comments