कोल्हापूर - केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद शाळेतील लोखंडी प्रवेशद्वार डोक्यावर कोसळून शाळकरी मुलाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी शाळा मुख्याध्यापक व शिक्षिका यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असन मुख्याध्यापक कृष्णात माने व शिक्षिका वंदना माने यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाइकांसह ग्रामस्थ संतप्त झाले असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे सीईओ व शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून या घटनेला जबाबदार शाळेतील शिक्षकांसह वरिष्ठ अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
याप्रकरणी विक्रमसिंह भीमराव माने यांनी करवीर पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक कृष्णा माने व शिक्षिका वंदना माने यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी शाळेला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. फिर्यादीत म्हटले आहे की शिक्षिका वंदना माने यांनी स्वरूप माने यास नादुरुस्त असलेल्या लोखंडी प्रवेशद्वाराला बांधलेली दोरी व ओढणी सोडून प्रवेशद्वार सरकवण्यास सांगितले. स्वरूप लोखंडी प्रवेशद्वाराची बांधलेली दोरी आणि ओढणी सोडून प्रवेशद्वार बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत असतानाच लोखंडी प्रवेशद्वार स्वरूपच्या डोक्यावर कोसळले.
डोक्याला गंभीर इजा झाल्याने मुलगा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या कान, नाकातून तसेच तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. हे प्रवेशद्वार लोखंडी, मोठे व वजनाने जड असतानाही; किंबहुना हे काम स्वरूपच्या आवाक्याबाहेरचे असतानाही हे प्रवेशद्वार बाजूला ढकलण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात माने व शिक्षिका वंदना माने यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, असेही पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.
0 Comments