मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर महायुतीला मिळालेल्या जागा पाहता महायुतीमधील अनेक नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या निकालावर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हणाले कि आजचा महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल हा अनाकलनीय अनपेक्षित आहे. मला पटला नाही, तरी हा निकाल लागला आहे. आज लाटेपेक्षा त्सुनामी आली असा हा निकाल आहे.
विरोधी पक्षांना शिल्लक ठेवायचं नाही, वन पार्टी वन नेशन भाजपला करायचा आहे, हे जेपी नड्डा म्हणाले होते, एका पक्षाचं सरकार येईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. महायुतीला मतं लोकांनी प्रेमापोटी दिली की रागापोटी, असा तिरकस प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तसेच, या त्यांच्या यशाचं गुपित शोधावं लागेल. जनतेला हा निकाल मान्य आहे का? सोयाबीनला भाव नाही, महिला असुरक्षित आहेत. कोरोनामध्ये कुटुंबप्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल यावर माझा विश्वास नाही. नक्की काही तरी गडबड आहे, असंही ते म्हाणले.
विधानसभेचे निकाल लागले पण हा जनतेचा काल नाही. भाजपपुरस्कृत महायुतीला 230 जागा मिळू शकतात. यावर कोणाचा विश्वास बसेल? बेइमान शिंदे गट 57 आणि तोळामांसाचा अजित पवार गट 41 जागांवर विजयी झाला. हा निकाल विचलित करणारा आहे. राज्यातील सरकारविरोधात प्रचंड असंतोष धुमसत होता. सर्व बेइमानांना गाडायचेच अशा निर्धाराने महाराष्ट्राची जनता मतदानाला उतरली असताना एका झटक्यात सर्व बेइमान विजयी होतात हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानी प्रतिमेला धक्का देणारा आहे. हा निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसने निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. समान संधीची परिस्थिती विस्कळीत झाल्याने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा पराभव केला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मोठा विजय कसा मिळाला, हा तपासाचा विषय आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
कांग्रेस नेते पवन खेरा म्हणाले कि महाराष्ट्रातील अनपेक्षित निकालांचा आम्ही विचार करत आहोत. भाजपने नरेंद्र मोदींच्या नावावर लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मते मागितली होती. त्यावेळी मतदारांनी भाजपचा पराभव केला. याच राज्याने भाजपला 4-5 महिन्यांच्या कालावधीत 148 पैकी 132 जागा दिल्या. हा कसला स्ट्राइक रेट आहे? हा स्ट्राइक रेट शक्य आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपा युती व महाविकास आघाडीत काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह आहे, तर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘अविश्वसनीय! तूर्तास एवढेच...’.
हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. राऊत म्हणाले की मत पत्रिकावर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असा दावा राऊतांनी करत संपूर्ण निकालावर संशय व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले कि राज्यातील निकाल हे धक्कादायक आहेत. या निकालामुळे जन सामान्य जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. धर्माचा आणि पैशांचा उपयोग केला गेला. महायुतीला मिळलेल्या जागा हे त्यांचे यश नाही, ओढून ताढुन युकत्या करून महायुतीने यश मिळवले आहे. ज्या साधनांचा वापर भाजप करतय यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होणार आहे. पुढील काळात लोकशाही कुठे जाईल, याची काळजी वाटणारी ही निवडणूक असल्याचही थोरात यांनी म्हटले.
0 Comments