ठाणे/दै.मू.वृत्तसेवा
राज्यातील विधानसभा निवडणूकीत भाजप धार्मिक धु्रवीकरण करण्याचा पूरजोर प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे, असे प्रचार सभेत सांगत आहेत. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक है तो सेफ है, अशी घोषणा देत आहे. यातून त्यांना हेच सांगायचे आहे कि हिंदू खतरे में है. यावरून एनसीपी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर हल्लबोल केला आहे. आज महाराष्ट्रात भाजपच्या पायाखालची जमीन सरकताना दिसत आहे, त्यामुळे त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांच्या नावाने घाबरवण्याची नवी भूमिका सुरू केली आहे. असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले कि देशात आणि राज्यात द्वेष पसरवण्याची भाजपची जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असून, त्यात टोप्या घातलेले काही मुस्लिम चेहरे दाखवले जात आहेत आणि त्यात ‘ एक रहोंगे तो सेफ रहोंगे’, असे लिहिले आहे. यामागे कोणते कारण आहे, हे विचारायचे आहे की देशात जाती-धर्माच्या नावावर कोणी फूट पाडली? अस्पृश्यता आणि उच्च-नीच हे हा भेद कोणी निर्माण केला? समाजात भेदभावाची प्रवृत्ती कोणी सुरू केली? जरा इतिहासाचा अभ्यास करा, एकीकडे जाती-धर्माच्या नावावर आरक्षण संपवण्याचे काम भाजप करत आहे आणि समाजात फूट पाडून आज फूट पडली तर कापून टाकू असे म्हणत आहे. असा टोला ही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, या राज्याचा मुख्यमंत्री असूनही तुम्हाला जनता असुरक्षित वाटत असेल तर तुम्ही राजीनामा का देत नाही. असे वादग्रस्त आणि समाजातील विषारी विधान आजपर्यंत कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी दिलेले नाही, जे भाजपकडून दिले जात आहे. ही निवडणूक होत आहे का, देशात आणि राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचा डाव आहे का, हे मला विचारायचे आहे, असे आव्हाड म्हणाले.
भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांना निवडणुकीच्या निकालाची भीती वाटते, त्यामुळे अशी विधाने करून ते राज्यात धर्माच्या भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत आणि दुसरीकडे मुस्लिमांबद्दल समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करून मतांचे राजकारण करत आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले की मुंब्य्रातील कौसा आणि रेतीबंदर सर्कलच्या वाय जंक्शनवर कडक नाकाबंदी लावण्याचे आवाहन मी पोलिसांना करणार आहे, कारण कोट्यवधी रुपये बाहेरून वाटपासाठी येत आहेत. मुंब्य्रातही मतदार आणि नागरिकांना मारण्यासाठी बाहेरून गुंड बोलावले जात आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
खरं तर देशाचा प्रधानमंत्री हिंदू, राष्ट्रपती हिंदू, उपराष्ट्रपती हिंदू, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हिंदू, अनेक राज्याचे राज्यपाल हिंदू, तिन्ही सेनादलाचे प्रमुख्य हिंदू, मग हिंदू खरमें कसा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0 Comments