छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील अराफत मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई केली. या प्रकरणात मेडिकल चालकासह दोन होलसेल विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरीत्या गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची विक्री होत असल्याची तक्रार औषध निरीक्षक जीवन जाधव यांच्या कार्यालयात प्राप्त झाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. १४) औषध निरीक्षक अंजली मिटकर यांना ग्राहकाच्या भूमिकेत अराफत मेडिकल स्टोअर्सवर पाठवण्यात आले. त्यांनी एमटीपी किटची मागणी केल्यावर १,५०० रुपये घेऊन मेडिकल चालकाने खिशातून किट दिली. मात्र, त्याचे बिल दिले नाही.
पथकाने छापा टाकून मेडिकल चालक शेख जैद पाशा आयुब पाशाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गेस्टाप्रो कोम्बिपॅक ऑफ मिफेप्रिस्टन टॅबलेट आणि सेफ अबोर्ट किट आढळून आले. या प्रकरणात औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
होलसेल विक्रेत्यांच्या घरीही तपासणी
शेख याने सांगितले की, संजय कौल (रा. उस्मानपुरा) व अभिलाष शर्मा (रा. समर्थनगर) या होलसेल विक्रेत्यांकडून त्याने विनाबिल किट खरेदी केली होती. शेखने फोनवर कौल याच्याकडे पुन्हा किट मागितल्यावर पथक त्याला घेऊन कौलच्या घरी गेले. कौल याने शर्टच्या खिशातून ९५६ रुपयांच्या दोन किट दिल्या, मात्र त्याचेही बिल दिले नाही. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात भारतीय दंड विधान व औषध कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त आर. एम. बजाज, सहाय्यक आयुक्त एस. एन. साळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 Comments