ठाणे - विधानसभा निवडणकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाच्या बहुतांश पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय घेत फेर मतमोजणीसाठी निवडणूक विभागाकडे पैसे भरले आहेत. अशातच दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले कि ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमचा डाटा नष्ट करण्यात आला आहे. फेरमतमोजणी दरम्यान ईव्हीएममध्ये कोणताही दोष नसल्याचे दाखवण्यासाठी दुसरे ईव्हीएम दाखवले जाईल, असा आरोप त्यांनी केला आहे.
आव्हाड म्हणाले की, ज्या यंत्रात मतदान झाले, ती दाखवणार नसतील आणि त्याजागी दुसरी यंत्रे दाखवणार असतील, तर फेरमतमोजणीचा उपयोग काय आहे. ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे. 2019 ते 2024 या कालावधीत पाच लाख नवीन मतदार नोंदणी झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत 46 लाख नवीन मतदान झाले. सहा महिन्यात 46 लाख मतदार वाढले कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतयंत्रे बंद केली जातात. तेव्हाच मतांची आकडेवारी निवडणूक विभागाला प्राप्त होते. परंतु दुसऱ्या दिवसांपर्यंत निवडणूक विभागाच्या आकडेवारीत वाढ होते कशी, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. यात निवडणूक विभागाचा सहभाग आहे. निवडणूक विभागाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. कारण, ही उत्तरे मिळणे हा आमचा अधिकार आहे. असेच सुरू राहिले तर भारत हा लोकशाही देश होता, हे इतिहासात लिहिण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे हा सगळा घोटाळा असून त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी भारतीय निवडणूक आयोगानुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02 टक्के होती. साधे गणित आहे कि 9,64,85,765 याचे 65.02 टक्के म्हणजे 6,27,35,044.4. मात्र निवडणूक आयोगाने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर 65.02 टक्के केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात? 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 या पाच वर्षात महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे! हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे की मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतातः पहिला मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? आणि दुसरा भारतीय निवडणूक आयोग चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का?
असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. या दोघांपैकी काही जरी झालं असेल तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे की 13 लाख अतिरिक्त मते का आहेत? महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का? अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल निवडणूक आयोगाने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
0 Comments