कोल्हापूर – वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर शहर महासचिव महाबोधी पद्माकर यांच्या नेतृत्वाखाली आज प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिल्ह्यातील काही शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटण्यात येत असलेल्या “चिंतामण्यांच्या कार्यपुस्तिका” या नावाच्या पुस्तकांवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शाळांमध्ये या पुस्तकाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये आरएसएसच्या विचारसरणीचा उल्लेख आहे.
संबंधित कार्यपुस्तिकांमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे प्रसारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंतामणी महाशब्दे यांच्या हस्ते या पुस्तिका तयार करण्यात आल्या असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रचार या माध्यमातून शाळांमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि पक्षीय विचारसरणीचा प्रभाव निर्माण होण्याची भीती असल्याचे वंचित बहुजन आघाडीने नमूद केले आहे.
संविधानिक शिक्षण पद्धतीनुसार शासकीय शाळांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा, धार्मिक संघटनेचा किंवा व्यक्तीचा प्रचार होऊ नये, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केली आहे.
आघाडीने पुढील मागण्या शिक्षण विभागाकडे केल्या आहेत —
1. अशा “चिंतामण्यांच्या कार्यपुस्तिका” किंवा तत्सम पुस्तकांचे वितरण तात्काळ थांबवावे.
2. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी.
3. शासकीय शाळांमध्ये कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विचारांचा प्रसार होणार नाही याची खात्री करावी.
4. अशा प्रकारच्या कार्यपुस्तिका मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सौजन्य: वंचित बहुजन आघाडी
0 Comments